Phone
+91 9422073551Address
Kasturi Niwas, Chatrapati Sambhaji Nagar, Murabad, Maharashtra 421401© Alrights reserved
by MLA Shri Kisan Kathore
नऊ वर्षांपूर्वी विजयादशमीच्या मुहुर्तावर कुळगांवातील समाजस्नेही गोळे कुटुंबाने काका गोळे फाऊंडेशनच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना किफायतशीर दरात चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा देण्यास सुरुवात केली. फाऊंडेशनतर्फे संकल्प दवाखाना, संकल्प पॅथॉलॉजी लॅब, संकल्प होमियोपॅथी क्लिनिक, रक्तदान शिबिरे, वातानुकुलीत शवपेटी, फिजिओथेरेपी आदी सुविधा वर्षभर बदलापूरकरांना अत्यंत माफक किंमतीत उपलब्ध करून दिल्या जातात. आमदार किसन कथोरे यांना फाऊंडेशनच्या या उपक्रमांविषयी अत्यंत आदर असून ते नियमितपणे ‘संकल्प’ च्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. आशिष गोळे, तनुजा गोळे आणि त्यांचे सहकारी या आरोग्य चळवळीचे व्यवस्थापन पाहतात. या प्रकल्पासाठी लागणारी भांडवली गुंतवणूक, त्याचा दैनंदिन खर्च गोळे फाऊंडेशन उचलते. साधारणपणे खाजगी आरोग्य सेवांच्या व्यावसायिक दरांपेक्षा ५० टक्के कमी दरांमध्ये या वैद्यकीय सेवा बदलापूरकरांना दिल्या जातात. दरवर्षी साधारणपणे सरासरी ४० हजारांहून अधिक बदलापूरकर या आरोग्य सुविधांचा लाभ घेतात.
बदलापूर पूर्व आणि पश्चिम विभागात दोन संकल्प दवाखाने फाऊंडेशनच्या वतीने सुरू असून तिथे फक्त ३० रूपयांमध्ये रुग्णांची तपासणी आणि औषधे दिली जातात. गेली २१ वर्षे संस्थेच्या वतीने नियमितपणे रक्तदान शिबिरे घेतली जातात. या चळवळीच्या माध्यमातून आतापर्यंत बदलापूरमधील दहा हजारांहून अधिक रक्तदात्यांनी ऐच्छिक रक्तदान केले आहे. या आरोग्य सुविधांव्यतिरिक्त शहरातील सार्वजनिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी काका गोळे फाऊंडेशनने खुला रंगमंच उपलब्ध करून दिला आहे. सर्व प्रकारचे सरकारी दाखले देणारे ई सेवा केंद्र संकल्प सेवामार्फत चालवले जाते. कोंडेश्वर, भोज परिसरात फाऊंडेशनच्या माध्यमातून दोन हजारांहून अधिक वृक्षांची लागवड आणि संवर्धन करण्यात आले आहे. शिरगांव येथील श्री समर्थ विद्यालयाची संपूर्ण जबाबदारी काका गोळे फाऊंडेशनने घेतली आहे. संकल्प स्टडी सेंटर आणि अभ्यासिकेचा दरवर्षी शेकडो विद्यार्थी लाभ घेतात. एकूणच बदलापूरकरांना अभिमान वाटावा आणि इतर शहरांनी अनुकरण करावे, अशी आरोग्य, शैक्षणिक, पर्यावरण आणि सांस्कृतिक चळवळ फाऊंडेशनच्या वतीने अव्याहतपणे सुरू आहे.
Website and App developed by WE-cts
© 2024 | All rights reserved by Shri. Kisan Kathore