कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील माता भगिनी सहसा गरजेशिवाय कुठे बाहेर फिरायला जात नाहीत. नातेसंबंधातील लग्नकार्य अथवा अन्य आवश्यकतेनुसारच त्यांचा बाहेरगावी प्रवास होतो. पर्यटन त्यांच्या गावीही नसते. चाकोरीबद्ध जीवन जगणाऱ्या घरातील या महिलांना एक दिवस का होईना मनसोक्त सहल घडवून आणण्याचा संकल्प आमदार किसन कथोरे यांनी केला. त्यातून श्रावण महिन्यात आमदारांच्या पुढाकाराने त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी मुरबाड मतदार संघातील तब्बल ६० हजारांहून अधिक महिलांना त्र्यंबकेश्वरची यात्रा घडवली. त्यात मुरबाड, कल्याण, बदलापूर आणि अंबरनाथ ग्रामीण भागातील महिलांचा समावेश होता. सर्व वयोगटातील महिलांनी या यात्रेचा लाभ घेतला. यानिमित्ताने पावसाळ्यात चोहीकडचा हिरवा निसर्ग पाहत नाशिक जिल्ह्याची सैर करण्याची संधी महिलांना मिळाली. या यात्रेसाठी उत्तम प्रतीच्या गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व यात्रेकरू महिलांना नाश्ता, पाणी आणि सुग्रास जेवणाची सोय करण्यात आली होती. हजारो महिलांचा सहभाग असलेल्या या यात्रा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्या. उत्तम नियोजनामुळे महिलांना या यात्रेचे मनमुराद आनंद घेता आला. त्याबद्दल त्यांनी आमदार कथोरे यांना धन्यवाद दिले आहेत.