जानेवारी महिन्यात अयोध्येतील भव्य राममंदिराचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते भव्य स्वरूपात उद्घाटन करण्यात आले. यानिमित्ताने देशभरात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. सांस्कृतिक नगरी बदलापूरमध्ये आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने शहरातील स्वयंसेवी आणि अध्यात्मिक संस्थांच्या सहकार्याने कुळगांव गांधीचौक येथील मराठी शाळेच्या पटांगणात सात दिवसीय भव्य श्रीराम महोत्सव आयोजित करण्यात आला होता. श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण होते. या महोत्सवात रोज संध्याकाळी भक्तीगीते, राम संकीर्तन, गीतरामायण आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून बदलापूरकरांनी या महोत्सवाला उदंड प्रतिसाद दिला.