कसारा आणि खंडाळा या दोन घाटरस्त्यांना जोडणारा शहापूर- कर्जत व्हाया मुरबाड रस्ता या भागातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत सोयीची ठरला आहे. याच रस्त्यावर ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा भरणारे मुरबाड तालुक्यातील म्हसा हे महत्वाचे महसुली गांव लागते. दहा वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या असाईड योजनेतून आमदार किसन कथोरे साहेबांनी या रस्त्यासाठी निधी आणला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. कर्जत-मुरबाड दरम्यान ५४ किलोमिटर अंतर आहे. समृध्दी आणि वडोदरा महामार्गाबरोबरच हे रस्तेही मुरबाड मतदार संघाच्या विकासासाठी पोषक ठरणार आहेत. सध्या सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेतला असता शहापूर-मुरबाड कर्जत या महामार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी तब्बल १२०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे त्यातील निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले असून येत्या काळात उर्वरित सर्व काम पूर्ण केले जाणार आहे. शहापूर, मुरबाड, कर्जत मार्गे खोपोलीहून पुण्याला जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा ठरणार आहे.