मुंबई महानगर प्रदेशातील वेगवान आणि आरामदायी प्रवासाचे स्वप्न मेट्रो सेवेमुळे पूर्ण होत आहे. विविध मार्गांवरील मेट्रो सेवा कार्यान्वित होत आहेत. बदलापूरकरांसाठी विशेष आनंदाची बाब म्हणजे स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी पाहिलेले बदलापूर मेट्रोचे स्वप्न आता लवकरच प्रत्यक्षात येणार आहे.
‘एमएमआरडीए’ने बदलापूरच्या या प्रस्तावित मेट्रो १४ चा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी इटलीतील मे. मिलान मेट्रो या कंपनीची नियुक्ती केली होती. त्यांनी त्यांचा अहवाल प्रशासनाला सादर केला आहे. ‘सार्वजनिक-खाजगी भागिदारी’ या तत्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या सविस्तर प्रकल्प अहवालाचे सूक्ष्म परिक्षण करण्यासाठी मुंबई आयआयटी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या मेट्रोमुळे केवळ बदलापूरच नव्हे तर अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली या परिसरातील नागरिकांनाही लाभ होणार आहे.